पाकिस्तानात शिवमंदिराच्या जमिनीवर बेकायदा कब्जा   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तांडो जाम शहराजवळ असलेल्या १०० वर्ष जुन्या शिवमंदिराच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करण्यात आला आहे. तसेच त्याभोवती बांधकाम सुरू करण्यात आल्याचे पाकिस्तानमधील हिंदू समुदायाचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘दरावर इत्तेहाद पाकिस्तान’चे प्रमुख शिवा कच्छी यांनी सांगितले.कच्छी म्हणाले की, कराचीपासून १८५ किमी अंतरावर असलेल्या तांडो जाम शहराजवळील मुसा खतियान गावातील शिव मंदिर आणि मंदिराभोवतीची चार एकर जमीन एका समितीद्वारे व्यवस्थापित केली जाते. हे मंदिर शंभर वर्ष जुने आहे. या जमिनीवर काहींनी बेकायदेशीरपणे कब्जा केला असून, त्याभोवती बांधकाम सुरू करण्यात आले आहे. शिव मंदिराकडे जाणारा मार्ग आणि प्रवेशद्वारावर अडथळा निर्माण झाला आहे. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सिंध वारसा विभागाने गेल्या वर्षी त्याचे नूतनीकरण केले होते. या मंदिराच्या जागेत दरवर्षी धार्मिक समारंभ आयोजित केले जातात. दर सोमवारी हिंदू धर्मीय मंदिरात भजन गातात. मंदिराजवळ हिंदूंसाठी एक स्मशानभूमी देखील आहे.  कच्छी यांनी पाकिस्तान सरकारला मंदिराभोवती सुरू असलेले बेकायदा बांधकाम थांबवण्याचे आवाहन केले आहे. ऐतिहासिक हिंदू मंदिरांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Related Articles